अॅलेक्स कॅरी(फोटो-सोशल मीडिया)
Alex Carey Create History : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अॅलेडलेड येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर चांगलीच घट्ट पकड निर्माण केली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघ २८६ धावांवर आटोपला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाच्या आधारावर ८५ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद २७१ धावा केल्या आणि ३५६ धावांची आघाडी घेतली आहे. यासामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीने खास कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या डावात देखील आपली दहशत कायम राखली. चार विकेट गमावल्यानंतरही, संघाने २७१ धावा केल्या आणि त्यांची आघाडी ३५६ धावांपर्यंत पोहचवली. या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची ठरली आहे.
अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकवले आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्याने १४३ चेंडूंचा सामना करत १०६ धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान कॅरीने ८ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावांचा मोठा टप्पा गाठला होता.
दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. जॅक वेदरल्ड फक्त १ धाव करून बाद झाला. तर मार्नस लाबुशेन फक्त १३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने ५१ चेंडूत ४० धावा करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संयमी फलंदाजी केली. तो सध्या क्रीजवर असुन त्याने ९१ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाला अधिक भक्कम दिशेने पोहचवले आहे.
हेही वाचा : Ashes 2025 : अॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू
अॅलेक्स कॅरीने या कसोटी सामन्यात खास कामागिरीने छाप पाडली आहे. अॅशेस कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात पन्नासपेक्षा अधिक धावा करणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे. यापूर्वी, १९९५ मध्ये इयान हिली आणि २०१३ मध्ये ब्रॅड हॅडिन यांनी ही किमया साधली होती. जवळजवळ १२ वर्षांत प्रथमच, ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षकाने अॅशेस कसोटीच्या दोन्ही डावात पन्नासपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे.






