पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने कर्णकर्कश आवाजाच्या बुलेटचालकांना रोखण्यासाठी प्रथमच कायदेशीर कारवाईची (Pimpri Police Action) सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिस विभागाचे उप आयुक्त आनंद भोईटे म्हणाले, की वाहनचालकांनी सर्व वाहतुकीचे नियम पाळावेत. जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच, बुलेटचालकांनी त्यांच्या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये कोणतेही बदल करून इतर नागरिकांना त्रास देऊ नये किंवा पर्यावरण संरक्षण कायदा व नॉईज पोल्यूशन रुलचा भंग करू नये.
ते पुढे म्हणाले, की गॅरेजचालकांनी पण बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करू नयेत. कारण तपासात जर कोणत्याही गॅरेजचालक असे करताना आढळला तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. बरेच बुलेट वाहनचालक त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करतात. ज्यामुळे कर्णकर्कश आवाज येऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. यामुळे ध्वनीप्रदूषण होते. तसेच आजारी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना या आवाजाचा जास्त त्रास होतो. यामुळे नागरिक अशा वाहन चालकांवर कारवाई करावी मागणी करत असतात.
आयुक्तालायच्या वाहतूक शाखेकडून बुलेट वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल केल्याने कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. अशा वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर 1 जानेवारी 2022 पासून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे नियम भंग करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांकडून 1,000 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. गेल्या 6 महिन्यात 2,000 पेक्षा जास्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. पण, तरीही नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे वाहतूक विभागाने अशा नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे.
या अंतर्गत आता अशा वाहन चालकांना सीआरपीसी 41(1) प्रमाणे नोटीस बजावण्यात येते. यामुळे त्यांना कोर्टात हजर होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. या अंतर्गत 43 जणांवर गेल्या 5 दिवसांत म्हणजेच 26 जून ते 30 जून दरम्यान कारवाई करण्यात आली आहे. 28 जूनला 3 जणांवर, 29 जूनला 15 जणांवर तर 30 जूनला 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही विशेष मोहीमेची कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उप-आयुक्त आनंद भोईटे, सहपोलिस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.