महाड एमआयडीसी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने धडक कारवाई करत अत्यंत शिताफीने दुचाकी चोराला पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीच्या दहा दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शंकर काळे यांनी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी अधिकृतपणे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच या कारवाईत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रौ 11 च्या सुमारास रुपेश शंकर पवार राहणार. टेमघर महाड यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून चोरी झाली होती. याबाबत त्यांनी 23 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे यांनी त्वरित तपासाची चक्र वेगाने फिरवत घटना स्थळापासूनची सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा मागोवा घेतला. सदर आरोपी महाड शहराचे सावित्री नदीकिनारी मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांना बघून पळणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठलाग करून सावित्री नदी किनाऱ्यालगत झाडीत लपलेल्या सागर वीरेंद्रसिंग सोळंकी रा. आदर्शनगर, बिरवाडी, महाड या आरोपीच्या फिल्मी स्टाईलने झटापट करून मुसक्या आवळल्या. तसेच त्याचे दोन साथीदार युवराज विठोबा जगताप, रा.साकडी, महाड आणि सुहास रमेश नाईलकर, रुपवली, महाड यांना ताब्यात घेतले.
आरोपींना पोलिसांच्या खाक्या दाखविताच त्यांच्याकडून 11 दुचाकींची चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार कारवाई करत भिवंडी येथून 1, प्रतापगड 1, मंडणगड 2, रुपवली 2, साकडी 1, कुसगाव 1, महाड शहर 1 आणि चिंभावे येथून 1 अशा 11 पैकी 10 चोरीच्या दुचाकी जप्त करून त्यापैकी आठ दुचाकी चोरी प्रकरणी भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी महाड एमआयडीसी 6, माणगाव पोलीस ठाणे 1 आणि कांदिवली पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित दोन पैकी एकाची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात असून अन्य एक दुचाकी अनोळखी स्वरूपातील आहे.
सदर सर्व आरोपींना 24 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींपैकी सागर वीरेंद्रसिंग सोळंकी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी देखील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन, तळा पोलीस ठाण्यात एक तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या कारवाईतून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. सदरची धाडसी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, राजेश गोरेगावकर, हवालदार चनाप्पा अंबर्गे, सुशील पाटेकर, सिद्धेश मोरे, राजेश माने, सतीश बोटे, निखिल कांबळे, अमोल कुंभार, शितल बंडगर, पवन बारवकर यांनी बजावली असून पोलिसांकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाई बद्दल नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.