बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात (Samruddhi Highway Accident) झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या (Vidarbha Travels) बस चालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या चालकाला अटक देखील करण्यात आली आहे.
शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक होता. त्याच्यावर 279, 304, 337 व 427 आयपीसीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा झाला अपघात ?
एक जुलैच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस बुलढाणा सिंदखेडराजा परिसरात आली. त्यावेळी बसचा वेग जास्त होता. ही भरधाव बस थेट दुभाजकाला धडकली. त्यानंतर डिझेलची टाकी फुटली आणि बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवशांना बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह काही जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातस्थळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भेट दिली. समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार उपाययोजना प्राधान्याने अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना आलेली डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील.