File Photo : Prashant Jagtap
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून देशाचे गृहमंत्री असलेले अमित शाह तीन वर्षांसाठी गुजरातमधून तडीपार का झाले होते, याचा खुलासा आधी त्यांनी केला पाहिजे, असा प्रतिहल्ला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. दरम्यान, पुणे येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे प्रमुख आहेत, असे अमित शाह यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, “भाजपचे लोक पुण्यात येऊन गेले, त्यांनी काय विकास केला हे सांगण्यापेक्षा पवार साहेबांवर टीका करत बसले. महाराष्ट्र बातम्यांमध्ये यायचं असेल, तर पवार साहेबांवर टीका करणे हा त्यांचा एककल्ली कार्यक्रम आहे”. एका केसमध्ये गृहमंत्री अमित शाह तडीपार होते. त्यांनी पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणे हे बालिशपणाचे आहेच पण, आपली बुद्धी किती आहे हे दाखवून दिले आहे. तुम्ही तडीपार झाल्यानंतर महाराष्ट्रात का आश्रय घ्यावा वाटलं? नेमकी तुम्ही कोणत्या कारणासाठी तडीपार होता, हे तुम्ही देशातील जनतेला सांगावा, असे आव्हान जगताप यांनी अमित शाह यांना दिले.
दरम्यान, शरद पवार भ्रष्टाचार टोळीचे प्रमुख असतील, तर एखादा टोळीचा प्रमुख असेल, मग त्या टोळीचे सदस्य तुमच्याकडे आहेत, ते साधू संत आहेत का? पवार भ्रष्टाचाराचे सरदार असतील, तर मोदी सरकारने पद्मविभूषण का दिले? असे सवाल देखील जगताप यांनी उपस्थित केला.