ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील धरणीचा पाडा येथे घडली आहे. पाड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदनाल होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. दर्शना महादू परले असे मुलं दगावलेल्या मातेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील दिघाशी ग्रामपंचायत हद्दीतील धरणीचा पाडा येथील दर्शना परले या गर्भवती महिलेस १ सप्टेंबर रोजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने तीला प्रसुतसाठी दिघाशी येथील १ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात गावकरी निघाले होते; मात्र रस्त्याअभावी झोळीत टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत पायपीट करत असतानाच, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. मात्र आरोग्य सेवा ऊपलब्ध नसल्याने तातडीने ऊपचार मिळाले नाही. त्यामुळे, झोळीतच या मातेच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर दर्शनाला आपल्या मुलाचा मृत्यू पहावा लागला, हे शासकीय यंत्रणेचे अपयश आणि दुर्दैव म्हणावे लागेल.