नागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. यानंतरही गुन्हेगारीत सक्रीय असणाऱ्यांकडून सर्रासपणे शस्त्रे बाळगली जात आहेत. लकडगंड आणि पाचपावली पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक केली.
पाचपावली ठाण्याचे पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. दुचाकीवरून जाणारे दोन तरुण पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करत कामठी मार्गावरील एका गल्लीत त्यांना पकडले. सौरभ असज्जा (वय 19, रा. शनीचरा बाजार) आणि सौरभ करवाडे (वय 21, रा. हरिदासनगर, लष्करीबाग) अशी त्यांची नावे आहेत. सौरभकडे तलवार आढळून आली. यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली.
कुंभारपुरा, लालगंज येथील रहिवासी प्रशांत हेडाऊ (वय 24) याला लकडगंज ठाण्याच्या पथकाने अटक केली. हे पथक रविवारी मध्यरात्री गस्त घालत होते. मालधक्का येथील हनुमान मंदिराजवळून जात असताना प्रशांत दिसला. पोलिस आपल्याकडे येत असल्याचे बघून तो पळून जाऊ लागला.
पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे घातक चाकू आढळून आला. संबंधित पोलिसांनी आरोप गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असण्याची शक्यता लक्षात घेता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.