पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल वडगाव मावळ नवरात्री उत्सव 2025 कार्यक्रमामध्ये सहभागी झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ: सतिश गाडे : देश सक्षम होण्यासाठी प्रत्येक तरुण सक्षम व्हायला हवा. आणि त्यासाठी बौद्धिक क्षमतेसोबत शारीरिक क्षमतेचा विकास देखील तितकाच महत्त्वाचा आहे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सक्षमता येणे आवश्यक आहे. तरुण सक्षम झाला तर कुटुंब सक्षम होईल, समाज सक्षम होईल, राज्य सक्षम होईल परिणामी आपला देश सक्षम होईल असे मत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी व्यक्त केले.
वडगाव मावळ येथील नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे कार्यक्रमाचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कायदेतज्ज्ञ ड. केशव मगर, मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, अजित देशपांडे, दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत, संतोष भालेराव, अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.
मुलांचे पालक नव्हे तर मित्र बना
कार्यक्रमामध्ये बोलताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पालकांना आवाहन देखील केले. ते म्हणाले की, सध्याची जीवनशैली पाहता पालकांनी १० ते १८ वयोगटातील शालेय मुलांना सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना वेळ द्या. त्यांची मानसिता समजून घ्या. मुलांचे पालक नवे तर मित्र बना, असा सल्ला पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समाजात ड्रग्जचा आजार
समाजात ड्रग्जचा जो आजार पसरत चालला आहे, त्याला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी यासाठी पुढे येऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन करून त्यापासून दूर राहण्याबाबत देखील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी आवाहन केले. या वेळी भारतीय वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सदस्य ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन हर्षदा दुबे यांनी केले. मानपत्र वाचन अमोल ठोंबरे यांनी केले, तर आभार संदीप भालेराव यांनी मानले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकारांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मावळचे तहसीलदार यांना निवेदन
नाशिकमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांतनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार श्री. योगेश खरे, श्री. अभिजीत सोनवणे व श्री. किरण ताजने यांच्यावर एका ठेकेदाराच्या गुंडांकडून भ्याड हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात झाला असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे,सदर आरोपींवर तात्काळ मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.ए. एस. मल्टी सर्व्हिसेस कंपनीचा संबंधित ठेकेदार याच्याविरोधातही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.सदर कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. शासनाने त्वरीत व कडक कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.