भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) केलेल्या भाषणाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद सिद्ध केली आहे. आपल्या परखड भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, “भारत स्वतःच आपले निर्णय घेतो आणि भविष्यातही तो आपले पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य कायम ठेवेल.”
शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८० व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करताना जयशंकर यांनी “भारत के लोगों की ओर से नमस्कार” असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, आज भारत ‘आत्मनिर्भरता’, ‘आत्मरक्षा’ आणि ‘आत्मविश्वास’ या तीन प्रमुख सिद्धांतांवर पुढे जात आहे. ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे स्वतःची क्षमता वाढवणे आणि प्रतिभांना संधी देणे. ते म्हणाले, “विनिर्माण असो, अंतराळ कार्यक्रम असो, औषध उत्पादन असो किंवा डिजिटल तंत्रज्ञान, भारताच्या प्रगतीचा फायदा संपूर्ण जगाला होत आहे.”
#WATCH | At the 80th session of UNGA, EAM says, “India has confronted this challenge since its independence, having a neighbour that is an epicentre of global terrorism. For decades now, major international terrorist attacks are traced back to that one country.… pic.twitter.com/WNV5pJDnFe — ANI (@ANI) September 27, 2025
‘आत्मरक्षा’ यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या लोकांचे संरक्षण आणि देशांतर्गत तसेच परदेशात त्यांच्या हिताचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. याचा अर्थ, दहशतवादाला कोणताही थारा नाही, सीमांची मजबूत सुरक्षा, विविध देशांसोबत भागीदारी कायम ठेवणे आणि परदेशातील भारतीयांना मदत करणे. ‘आत्मविश्वास’ म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताला आपली आजची स्थिती आणि भविष्यातील उद्दिष्टे पूर्णपणे माहित आहेत.
जयशंकर यांनी ठामपणे सांगितले की, भारत आपल्या पर्यायांची निवड करण्याचे स्वातंत्र्य नेहमी कायम ठेवेल. ते म्हणाले की, भारत ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बनून राहील. तसेच, जेव्हा युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये दोन मोठे संघर्ष सुरू आहेत, तेव्हा संयुक्त राष्ट्र अपेक्षेवर खरे उतरले आहे का, असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटले, “जे देश सर्व बाजूंच्या संपर्कात राहू शकतात, त्यांनी या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी पुढे यायला हवे.”
जयशंकर यांनी व्यापार आणि शुल्क धोरणांवरही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, आता आपण शुल्कातील अस्थिरता आणि अनिश्चित बाजाराचा सामना करत आहोत. यामुळे, एकाच पुरवठादार किंवा विशिष्ट बाजारपेठेवर जास्त अवलंबून न राहता धोका टाळणे महत्त्वाचे झाले आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के शुल्क लावले आहे, ज्यात रशियाकडून तेल खरेदीवर २५ टक्के शुल्क समाविष्ट आहे, या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे.