'...तर मालमत्ता सील करणार'; बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा थकबाकीदारांना इशारा
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ चा मालमत्ता कर, गाळेभाडे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी आणि चालू बाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ मालमत्ता कर, पाणीपट्टीचा भरणा नगरपरिषदेकडे करावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार मालमत्ताधारकांनी थकीत व चालू मालमत्ता कर, गाळेभाडे व पाणीपट्टी यांची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. जे मालमत्ताधारक विहित मुदतीत या रकमांचा भरणा करणार नाहीत, अशांच्या थकीत मागणीच्या रकमेवर दरमहा दोन टक्के व्याजाची आकारणी सुरु आहे. त्यामुळे व्याज आकारणी टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर, गाळेभाडे, पाणीपट्टी नगरपरिषदेच्या कार्यालयात भरावेत; अन्यथा मालमत्ता सील करणे, गाळा सील करून नगरपरिषदेच्या ताब्यात घेणे, पाणीपुरवठा नळ कनेक्शन बंद करणे, मालमत्ताधारकांची नावे शहरातील प्रमुख चौकाचौकांत प्रसिद्ध करणे, यांसारखी कारवाई करण्याचे नियोजन केलेले आहे.
सर्व मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू रकमांचा तत्काळ नगरपरिषद कार्यालयात भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.
घरबसल्या भरता येणार टॅक्स
नागरिक घरबसल्या ब्रम्हांड ॲपवरून अथवा बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या आपला टॅक्स भरू शकता. नगरपालिका कार्यालय जळोची रुई व तांदुळवाडी क्षेत्रीय कार्यालय व अग्निशमन केंद्र या ठिकाणी टॅक्स भरण्याची सोय करण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.