पोलीस आयुक्तालयाचा कारभार अंतरिक्ष टॉवरमधून? पोलिसांनी मागवले जागा मालकांचे अर्ज
पुणे : नरपतगिरी भागात असलेल्या अंतरीक्ष बहुमजली इमारतीमधून (टॉवर) शहर पोलीस आयुक्तालयाचा कारभार चालवला जाण्याची दाट शक्यता आहे. तत्पुर्वी पुणे पोलिसांनी आयुक्तालयाला जागा देण्यास इच्छुक असणाऱ्या जागा मालकाकडून अर्ज मागवले असून, तीन योग्य जागा आल्यानंतर त्यासंदर्भात शासनाला परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे सांगितले.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कालावधीत पूर्ण जागा बांधकाम व्यवसायिकाने द्यावी अशी मागणी केली आहे. त्यादृष्टीने पोलीस नवीन जागा शोधून त्या ठिकानावावरून कामकाज सुरू करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. मात्र आता जागेचा शोध समाप्त होण्याची शक्यता असून, अंतरिक्ष टॉवर येथून कारभार चालण्याची शक्यता आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता
पुणे शहराच्या वाढत्या गरजा व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी नव्या आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त प्रशासकीय इमारतीची गरज आहे. सध्याच्या आयुक्तालयाच्या जागी नवीन इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्याचे कार्यालय स्थलांतर करणे आवश्यक ठरले आहे. या निर्णयानुसार, पोलीस विभागाने ४८,००० चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असणाऱ्या जागेचा शोध सुरू केला आहे.
योग्य जागेसाठी निकष
नवीन कार्यालयासाठी आवश्यक जागा सध्याच्या पोलिस आयुक्तालयाच्या तीन चौरस किलोमीटरच्या परिघात असणे बंधनकारक आहे. तसेच, ती जागा पोलिस कामकाजासाठी उपयुक्त आणि सुयोग्य असावी. पोलिस विभागाने जागा उपलब्ध असलेल्या मालकांना त्यांच्या जागेची माहिती आणि प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.
अर्ज कसा करावा?
जे जागा मालक या निकषांनुसार आपली जागा भाड्याने किंवा इतर स्वरूपात उपलब्ध करून देऊ इच्छितात, त्यांनी आपले प्रस्ताव दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालय, जीपीओजवळ, पुणे – ४११००१ येथे सादर करावेत.
या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि नवीन प्रशासकीय इमारतीचे काम वेगाने पूर्ण करता येईल. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
– रंजन कुमार शर्मा (पोलीस सहआयुक्त, पुणे शहर)