
Pune Voter List, Pune Election Department,
दावे आणि हरकतींच्या निपटाऱ्यादरम्यान मतदारांना आपली बाजू मांडण्यासाठी तीन वेळा संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही संबंधित नागरिक सुनावणी प्रक्रियेत सहभागी झाला नाही, तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील नोंदींच्या प्रत्यक्ष पडताळणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कलसकर यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत या निर्णयाची माहिती दिली.
निवडणूक कामाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. पारदर्शक सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी नियोजनबद्ध आणि वेळबद्ध वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रशासनाकडून प्रत्येक पात्र किंवा संबंधित मतदाराला आपली बाजू मांडण्यासाठी एकूण तीन स्वतंत्र नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. या तिन्ही संधींचा लाभन घेणाऱ्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्याची कारवाई केली जाणार आहे.
आढावा बैठकीत एएसडीडी (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेले मतदार) यादीतील आकडेवारीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने तयार केलेल्या यादीनुसार जिल्ह्यात मोठ्या संख्येने असे मतदार आढळून आले आहेत, जे एकतर स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. या विशेष यादीत नाव असलेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्ती साठी निर्धारित नमुन्यात नवीन अर्ज सादर करावा लागणार आहे.
दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.
या सर्वपक्षीय बैठकीला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह प्रमुख राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या पडताळणी मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.