संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरधाव पीएमपीच्या दारातून तरुणी रस्त्यावर पडल्यानंतर पाठिमागून आलेल्या एका स्कूल व्हॅनने तिला चिरडले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणाऱ्या या पीएमपी बसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून ट्रिपलशीट व नियभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असताना अशा बसवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड आकारला जातो. दुचाकीवर तिघे बसले किंवा वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास नियमभंगाची कारवाई होते. शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीच्या बसमध्ये सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एम.टेकचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. गर्दीमुळे ती पीएमपी बसमधून खाली पडली आणि दुसऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पीएमपी बसमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पीएमपीची पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागात बससेवा आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १ हजार ९०० बस आहेत. मात्र, यातील काही बस सर्व्हिसिंग, दुरुस्ती आणि आरटीओशी संबंधित कामांमुळे रस्त्यावर नसतात. त्यामुळे प्रत्यक्षात दररोज सुमारे १,७०० ते १,८०० बसच प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याचे चित्र आहे.
सकाळी आणि सायंकाळी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत अनेक मार्गांवरील बसमध्ये प्रचंड गर्दी होते. काही बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते. गर्दीच्या वेळेचे नियोजन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त बसची व्यवस्था आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्यात पीएमपी कमी पडत असल्याची तक्रार आहे. एका बाजूला दुचाकीवर तीन जण बसल्यास किंवा कारमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास वाहतूक पोलिस कारवाई करतात. मग सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतानाही नियमांचा वेगळा निकष का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पीएमपी बसमधील गर्दीसोबतच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, त्याला नियम बनवावे अशी मागणी होऊ लागली आहे.
चोरट्यांचे हक्काचे ठिकाण
पुणे शहरात चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांना पीएमपी बस आणि त्याचे थांबे हे ‘पर्वणी’ ठरू लागले आहेत. कारण, बसमध्ये प्रचंड गर्दी होते. तर, बसमध्ये चढताना देखील नागरिकांची चढाओढ असते. याचाच गैरफायदा घेऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे गर्दीत बेसावध असलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्या गळ्यातील तसेच हातात असलेले दागिने चोरून नेतात. दुसरीकडे बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत चोरटे प्रवाशांना लुटतात. दुसरीकडे याठिकाणी अपघाताचा धोकाही असतो.
“पीएमपीकडे योग्य नियोजनाचा अभाव आहे. अनेक वेळा काही बस रिकाम्या धावताना दिसतात. मात्र, ज्या वेळेत आणि ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त बस सोडण्याचे नियोजन झाले पाहिजे. अनेक बस वेळापत्रकानुसार धावत नाहीत. काही वेळा अर्धा-अर्धा तास बस मिळत नाही. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या बसमध्ये गर्दी असूनही चढतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन गर्दीच्या वेळेत अतिरिक्त आणि स्पेअर बसची व्यवस्था करणे आवश्यक आहे.” -जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच.






