भक्तांसाठी धावणार ६२६ जादा बसेस (फोटो-सोशल मिडिया )
गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद किंवा वळविण्यात येणार आहेत. शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील वाहतुकीत बदल होणार असल्याने पीएमपीच्या नियमित बसमार्गांमध्येही आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत.
PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका भवन, डेक्कन आणि स्वारगेट या प्रमुख ठिकाणांहून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्दी वाढल्यास मागणीनुसार आणखी बस सोडण्याची तयारी पीएमपीने ठेवली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १७ ते २५ सप्टेंबरदरम्यान १४७ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
जादा बसेस : ६२६
विशेष बससेवा : १७ ते २५ सप्टेंबर
रात्रीची सेवा : १९ सप्टेंबरपासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत
प्रमुख बसस्थानके : महापालिका भवन, डेक्कन, स्वारगेट
पिंपरी-चिंचवडसाठी : १४७ जादा बसेस
तिकीटदर : नियमित दरानुसार; कोणतीही वाढ नाही
गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल, पाकीट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात.






