सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातील येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाच्या बगॅसला सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या आसपास भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बगॅसची वाहतूक करणाऱ्या आणि बगॅसने भरलेल्या मालवाहतूक ट्रकलाही आग लागल्याने काही क्षणातच हा ट्रक जागीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील साठवण असलेल्या बगॅसला (भुसा ) सोमवारी (दि. ३०) दहा वाजण्याच्या आसपास अचानक भिषण आग आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे ही आग काही क्षणातच परिसरात सगळीकडे पसरली. धुराचे लोटचे लोट हवेत पसरले होते. या आगीच्या झळीमुळे संरक्षण भिंतीच्या मोटेवाडा बाजुकडील रस्त्या लगतचे गवतही पेटले होते. तसेच या ठिकाणी बगॅस वाहतूक करणाऱ्या एका भरलेल्या मालवाहतुक ट्रकनेही पेट घेतला, ट्रकला आग लागली असल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने वाहनातून उडी टाकली, त्यामुळे वाहनचालक या दुर्घटनेत बचावला.
कारखाना परिसरात साठा असलेल्या बगॅसला या आगीने विळखा घातला. या आगीत मोठ्या प्रमाणात बगॅस जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्याने कामगारांची एकच धांदल उडाली, तसेच कारखान्याशेजारील रहिवासीही या घटनेमुळे भयभीत झाले. दरम्यान, कामगार आणि नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दौंड नगरपालिका आणि कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.
अंदाजे दोन ते तीन तास आगीची धग होती. तीन तासांनंतर ही आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत कारखान्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकली नाही. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी एक ट्रक जाळून जागीच खाक झाल्याने तसेच बगॅस ही मोठ्या प्रमाणात जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. यापुर्वीही कारखाना परिसरात साठा असलेल्या या बगॅसला आग लागल्याची घटना घडली आहे. सातत्याने आग लागल्याची घटना घडत असून, कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र आहे.






