संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील ‘नो पार्किंग’मध्ये उभी वाहने आता पुन्हा उचलली जाणार असून, पोलिसांकडून केली जाणारी टोईंग कारवाई तब्बल ६ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना अतिरीक्त शुल्क भरावे लागणार आहे. वाहन उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा करार संपुष्टात आल्याने डिसेंबर २०२५ पासून ही कारवाई बंद होती. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेला अद्याप अंतिम स्वरूप न मिळाल्याने राज्य सरकारने जुन्याच कंत्राटदाराला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत पुन्हा वाहन उचलण्याची मोहीम सुरू झाली आहे.
पुण्याच्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहन चालक त्रस्त आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहन चालकांमुळे या कोंडीत आणखीनच भर पडते. दरम्यान, पुणे पोलिसांकडून गेल्या ७ वर्षांपासून टोईंगद्वारे नो पार्किंगमधील वाहने उचलली जात होती. एका वाहनाला ७५६ रुपये दंड आकरला जात होता. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये ही कारवाई करार संपुष्टात आल्याने बंद झाला होता.
गेल्या ६ महिन्यांत टोईंग कारवाई बंद असल्याचा फायदा घेत अनेक वाहनचालकांनी प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा व व्यावसायिक भागांत सर्रास नियमबाह्य पार्किंग सुरू केले होते. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ झाली होती. विशेषतः लक्ष्मी रोड, जंगली महाराज रस्ता, एफ.सी. रोड, कर्वे रोड, स्वारगेट, हडपसर, कोथरूड आणि कॅम्प परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
आता टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाल्याने ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभाणाऱ्या चालकांना दंडासह टोईंग शुल्क भरावे लागणार आहे. वाहन टोईंग झाल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडे जाऊन दंडाची रक्कम तसेच वाहन उचलण्याचे शुल्क अदा करावे लागते. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांच्या मते, रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणांपैकी एक आहेत. टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाल्याने रस्ते मोकळे होण्यास मदत होईल आणि वाहतुकीचा वेग सुधारेल. दरम्यान, नागरिकांनी केवळ अधिकृत पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत, अन्यथा दंड आणि अतिरिक्त शुल्काला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.






