
पुण्यात 500 AI कॅमेरे बसवणार, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता...; अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
पुणे : एफसी रोडच्या धर्तीवर आता पुण्यात विविध ठिकाणी ५०० ‘एआय’ कॅमेरे बसवले जाणार आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारला जाणार आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून, हे एआय कॅमेरे रस्त्यावर लागल्यानंतर सर्व नागरिक दंडाच्या भीतीने तरी नियम पाळतील, असा विश्वास अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पुणे शहर ट्रॅफिक परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आयोजक पुणे शहर काँग्रेस (पश्चिम) विभाग अध्यक्षा दीप्ती चवधरी, पोलिस उपायुक्त (वाहतूक) संदीप भाजीभाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे, डॉ. राहुल सावंत, काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस अॅड. भाऊसाहेब आजबे, पीएमटी कामगार संघटनेचे सल्लागार गोपाळ तिवारी, काँग्रेस महाराष्ट्र कमिटीचे सचिव यशराज पारखी आदी उपस्थित होते.
नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक
मनोज पाटील म्हणाले, तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून वाहतुकीच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे. ही समस्या फक्त तंत्रज्ञान किंवा प्रशासनामुळे सुटणार नाही, तर नागरिकांनीदेखील यामध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या संदर्भात जर काही चुकीचे घडत असेल, तर ते नागरिकांनी प्रशासनाला सांगितले पाहिजे. शिवाय, सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रतितास २२ लाख वाहने रस्त्यावर असतात, तर दुपारी १२ ते ५ या वेळेत १२ लाख वाहने रस्त्यावर असतात. सकाळच्या वेळेत ५ ते ६ लाख वाहने रस्त्यावर असतात. म्हणून नागरिकांनीदेखील घराबाहेर पडताना शक्यतो ज्यावेळी वाहतूक कोंडी नसते, त्यावेळी बाहेर पडले पाहिजे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडीदेखील कमी होईल.
मेट्रोची क्षमता वाढत आहे
आता ३३ कि.मी.पर्यंत मेट्रो सुरू असून, येत्या दोन-तीन वर्षांत ती १०० किमीपर्यंत जाणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा व्यवस्थित वापर केला, तर अर्धे प्रश्न इथेच सुटेल.’पीएमपी’ मध्येदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. सध्या तंत्रज्ञानाचा वापर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि लोकसहभाग यावर विशेष भर दिला जात असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.
निष्कर्ष मुख्यमंत्र्यांना पाठवणार
दीप्ती चवधरी म्हणाल्या की, पुणे शहर वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे जात आहे, परंतु पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) वाढत नाही. वाहतूक कोंडीमुळे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत व प्रदूषण वाढत आहे. याचा आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होत आहे. मेट्रो आहे पण पार्किंगची सुविधा नाही. या परिषदेतून जे काही निष्कर्ष निघतील, तो अहवाल उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
संदीप भाजीभाकरे म्हणाले, अनेक ठिकाणी पे अँड पार्क करता येईल का? यावर विचार सुरू आहे. ॲलिस पोरे म्हणाल्या, पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटली, तर आम्हाला पीएमपी बसेसच्या फेऱ्या वाढवता येतील आणि नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देता येईल. आमच्याकडे फक्त १७ डेपो आहेत, यामुळे पीएमपीच्या बहुतांश बसेस रस्त्यावरच थांबवाव्या लागतात. बऱ्याच ठिकाणी पीएमपी बस वाढवण्याची मागणी होते, परंतु वाहतूक कोंडी किंवा रस्ते छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी सेवा देण्यात अडचणी येतात.
एटीएस सेंटर्सचा फायदा होईल
सुरेंद्र निकम म्हणाले की, महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत एटीएस केंद्रे (सेंटर्स) सुरू होत आहेत. यामुळे रस्त्यावर गाडी बंद पडण्याचे प्रमाण कमी होणार असून, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी ‘एआय’चा वापर करून उपाययोजना करण्याचे काम चालू आहे. जोपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम वापर होणार नाही, तोपर्यंत ही समस्या सुटू शकणार नाही. मंगेश कोळपकर यांनी वाहतूक समस्येवर सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले.
डॉ. राहुल सावंत म्हणाले की, ट्रॅफिकमुळे रोज भांडणे होत आहेत. यामुळे लोकांचे ब्लड प्रेशर वाढत असून, त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रॅफिकमुळे पेशंट वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाहीत, या बाबीकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.