धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्... (संग्रहित फोटो)
पिंपरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार हत्याराने खून करून पती पसार झाला. हा प्रकार बुधवारी (दि. २) रात्री साडेनऊ ते गुरुवार (दि. ३) पहाटे पाचच्या सुमारास बावधन येथील तोडकर वस्तीत उघडकीस आला. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलगा सुरेश परशुराम हरिजन (वय २४, रा. बावधन, मूळ रा. इंचनाळ, विजापूर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परशुराम भागप्पा हरिजन (वय ४८, मूळ रा. इंचनाळ, विजापूर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलाबाई परशुराम हरिजन असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई निलाबाई व वडील परशुराम हे घरात झोपलेले असताना परशुराम याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण केले. त्यानंतर त्याने कोणत्यातरी हत्याराने किंवा धारदार वस्तूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने निलाबाई यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हा प्रकार लक्षात आला असता मुलगा सुरेश यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरु आहे.
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
नागपुरातही अशीच एक घटना समोर आली. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नी यामिनी यादव (वय ३८, रा. झिंगाबाई टाकळी) हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना झिंगाबाई टाकळी परिसरात घडली. पतीने पत्नीच्या गळ्यावर तसेच पोटावर केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. मात्र, महिलेच्या शरीरावर बाहेरून गंभीर मारहाणीच्या स्पष्ट खुणा न दिसल्याने मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे.






