CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात मध्यरात्री बिबट्या येत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार एखाद-दुसऱ्या रात्रीपुरता मर्यादित नसून दर एक-दोन दिवसांच्या अंतराने बिबट्याचा वावर दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळा तो घराच्या परिसरात बराच वेळ फिरत असल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. चव्हाण यांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरात CCTV कॅमेरे बसवले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी घराच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर सुरू असल्याचा प्रकार समोर आला.
या घटनेतील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दर्शन चव्हाण यांच्या घरात सध्या केवळ तीन महिला राहत आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती सातत्याने बिघडत असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रात्री अचानक औषधांची गरज भासल्यास किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास घराबाहेर पडायचे कसे, असा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. घराच्या दारापर्यंत बिबट्याचा वावर असल्याने रात्री बाहेर पडताना जीव मुठीत घेण्याची वेळ या महिलांवर आली आहे.
कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे.तसेच गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत आरती, भजन आणि जागरणाचे कार्यक्रम सुरू असतात. ग्रामस्थ एकमेकांच्या घरी आरतीसाठी जातात. त्यामुळे रात्री गावातील नागरिकांची ये-जा ही मोठ्या प्रमाणात असते.
अशा परिस्थितीत गावाच्या परिसरात बिबट्याचा नियमित वावर सुरू असल्याने ग्रामस्थांची चिंता आणखी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बिबट्याकडून कोणावर हल्ला होण्याची किंवा जीवितहानी होण्याची घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गुहागर वन विभागाने परिसराची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी आणि गरज असल्यास बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी दर्शन चव्हाण आणि काजळी ग्रामस्थांनी केली आहे.
आता ग्रामस्थांच्या मागणीची वन विभागाकडून कशी दखल घेतली जाते आणि बिबट्याच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे काजळी गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






