
baramati crime news
खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. राधेय खलाटे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत डॉक्टरांच्या वर्तनाबाबत गंभीर आरोप केले आहेत.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, संबंधित महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. उपचारादरम्यान तिला सलाईन देण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. खलाटे यांनी पीडीतेला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. त्यावेळी तिच्यासोबत लहान मुलगाही होता.
डॉ. खलाटे यांनी पिडित महिलेचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके तपासल्यानंतर तिला पाठीसंबंधित काही व्यायाम करण्यास सांगितले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान डॉक्टर वारंवार जवळ येत असल्याचे आणि अंतर ठेवण्यास सांगूनही पुन्हा जवळ येत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.व्यायाम करत असताना डॉक्टरांनी कमरेला स्पर्श करून छातीत धडधड होत आहे का, अशी विचारणा केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्याने तिने पुढील व्यायाम करण्यास नकार दिला आणि औषधे देऊन घरी जाण्याची विनंती केली. त्यानंतर औषधे घेऊन ती घरी परतली.
घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. दुसऱ्या दिवशी दसऱ्यानिमित्त डॉक्टरांनी व्हॉट्सॲपवर शुभेच्छा संदेश पाठवल्यानंतर महिलेने त्यांना आधी घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावर डॉ खलाटे यांनी माफी मागून पुन्हा असे होणार नाही, असा संदेश पाठवल्याचा दावा पीडीत महिलेने केला आहे.
यानंतर पती बारामती येथे आल्यानंतर महिलेने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे डॉक्टरांविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, संबंधित डॉक्टरांची बाजू आणि पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.
नालासोपारा एमडी ड्रग्ज प्रकरणाचे तेलंगणापर्यंत धागेदोरे, अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक