SIR रद्द करा; कॉकरोच जनता पार्टीचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरंगा मोर्चा आंदोलन (फोटो सौजन्य-ChatGPT)
पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. हातात तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. देशातील मतदारांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत एसआयआरची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. देशात सुमारे १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावाही या वेळी करण्यात आला. दरम्यान, अभिजीत दिपके, नेहा बोरा आणि अन्य कार्यकर्त्यांना केवळ तिरंगा फडकवण्याच्या कारणावरून अटक करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नेहा बोरा यांना रात्री ताब्यात ठेवण्याच्या कारवाईवरही त्यांनी आक्षेप घेतला. संबंधित कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
‘आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत. आम्ही हिंसाचार करणारे नाही,’ अशी भूमिका मांडत कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवला. एसआयआर रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा या मागण्यांवर त्यांनी जोर दिला.






