
दादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते, दादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय; बारामतीकरांना सुनेत्रा पवारांसमोर अश्रू अनावर
बारामती : बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (दि १९) मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये सफाई कर्मचारी महिलांसोबत चहा घेत त्यांच्याशी संवाद साधला. बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात नियमित व्यायामासाठी व खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. यामध्ये एका नागरिकाने अजितदादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहत असल्याचे सांगत अजितदादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते, असे सांगत अजित दादांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामाचे मोठे कौतुक केले.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जाहीर सभांपेक्षा नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. थेट नागरिकांच्या संवादावरच त्यांनी भर दिला आहे. रविवारी सकाळी सुशोभीकरण करण्यात आलेल्या निरा डावा कालव्याच्या भराव्यावरून वॉकिंग करणाऱ्या नागरिकांची त्यांनी संवाद साधला. यामध्ये वयोवृद्ध महिला व नागरिकांशी भेटून त्यांनी चर्चा केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी व महिलांनी अजित दादांनी एखाद्या परदेशातील शहराप्रमाणे बारामती शहर बनवले असल्याने बारामती मध्ये आम्ही राहत असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, असे सांगत अजितदादासारखा नेता पुन्हा होणे नाही, आम्ही तुमच्या कायम बरोबर आहोत, असे आश्वासन महिलांसह नागरिकांनी सुनेत्रा पवार यांना यावेळी दिले.
जिल्हा क्रीडा संकुलात सुनेत्रा पवार यांनी भेट देऊन क्रीडा संकुलात व्यायाम करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या नागरिक व युवकांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी एका नागरिकाने अजितदादांची तरुणांना लाजवेल अशी चालण्याची पद्धत होती, आमचे ते आयडॉल होते. अविरतपणे काम करण्याची त्यांची पद्धत कायम आमच्या स्मरणात राहील, असे सांगत अजितदादांनी बारामतीसाठी दिलेले योगदान आम्ही बारामती कदापिही विसरणार नसल्याचे सांगत एका नागरिकाला अश्रू अनावर झाले.
दरम्यान युवा नेते पार्थ पवार हे ग्रामीण भागातील नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी व शरीर फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार यादेखील दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या साठी प्रचारात उतरल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्यासह बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत. दरम्यान पार्थ पवार हे दैनंदिन राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून प्रचार यंत्रणेची स्वतः माहिती घेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पूर्ण ताकतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन करत महायुतीची ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बारामती शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारात सक्रिय आहेत.