पुणे : कोकणातील हापूस आंब्याची एक पेटी आज गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात दाखल झाली. पाच डझनाच्या या पेटीला तब्बल १८ हजार रूपये भाव मिळाला.
देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्यापुर्वी बाजारात हंगामपुर्व हापूस आंब्याची तुरळक आवक होत असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुमकेश्वर कातवण गावातील शेतकरी रामभाऊ सावंत यांच्या बागेतून मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले यांच्या गाळ्यावर हापूस आंब्याची आवक झाली. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पुजन झाले.
यावेळी फळे व कांदा बटाटा विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे, तराकारीचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले, रामदास गायकवाड, अनिकेत भोसले, करण जाधव, राजेंद्र सुर्यवंशी, संजय वखारे, विलास थोपटे, नितिन जामगे आदी उपस्थित होते.
आडते रावसाहेब कुंजीर यांनी या आंब्याच्या पेटीची खरेदी केली. आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्ष कोकणातील आंबा उत्पादकांचे नुकसान झाले. यंदा भरघोस उत्पादनामुळे यंदा आंब्याचा हंगाम चांगला होणार असून शेतकऱ्यांना फायदा होईल.
शेतकरी चेतन सांवत म्हणाले, चांगल्या हवामानामुळे दोन वर्षांच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन चांगले आहे. फळधारणा चांगली असल्याने यंदा भरपुर आंबा उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंब्याचा हंगाम नियमित सुरू होईल.