पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित (सौजन्य - एआय)
पुणे : सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात विशेष मोहीम राबवून भेसळीच्या संशयावरून तसेच लेबलदोष व बनावट आढळलेल्या अन्न पदार्थांचा १८ लाख २५ हजार ८३२ रुपयांचा साठा जप्त केला. २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ही कारवाई करण्यात आली.
याशिवाय अस्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्याने १७ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील विविध दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, मिठाई विक्रेते, डेअरी, हॉटेल तसेच इतर आस्थापनांची तपासणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात नवनाथ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून २५ हजार ९२० रुपयांचा श्रीखंड, अदिती मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून ४३ हजार ९८० रुपयांची स्वीट लस्सी व मँगो लस्सी, तर ओशन मिल्क अँड फूड प्रॉडक्ट्स येथून २ लाख ७४ हजार ७०० रुपयांचा तूप व खोवा जप्त करण्यात आला.
दरम्यान, दूध व दुग्धजन्य सणासुदीच्या काळात खवा, मावा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. दूध व पदार्थांमध्ये वनस्पतीजन्य चरबी अथवा इतर घटकांचा अनधिकृत वापर करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
मार्केटयार्ड, उरुळी देवाचीमध्ये थेट कारवाई
मार्केट यार्डातील लक्ष्मीनारायण ट्रेडिंग कंपनी येथून ४ लाख ४८ हजार ३८० रुपयांचे बदाम, तर पुरंदर येथील पांडियन प्रॉडक्ट्स अँड सेलिंग येथून सुमारे ५.५६ टन विविध मिठाईचा ५ लाख ९६ हजार ३०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. उरुळी देवाची येथून २ लाख ५७हजार १६४ रुपयांचे चीज, वारजे येथून ५५ हजार ६०० रुपयांचे तूप, तर मोरबीवाला स्वीट्स अँड नमकीन येथून नमकीन पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
कोल्हापूर, सांगलीतही कारवाई
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतही दूधजन्य पदार्थ, तूप व क्रीमचा साठा जप्त करण्यात आला. अस्वच्छता, झुरळे व किटकांचा वावर तसेच अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि दूध संकलन केंद्रांसह १७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.






