पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 2025
पुण्यात विसर्जन मिरवणुकीला तूफान गर्दी
पहिल्या दोन मानाच्या गणपतींचे विसर्जन
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
आज लाडक्या गणपती बाप्पाची दहा दिवस सेवा केल्यानंतर आज (6 सप्टेंबर) त्याला निरोप दिला जात आहे. गणेशोत्सव हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. दरम्यान सर्व राज्यातच आज गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. इकडे पुण्यात देखील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या दोन गणपतींचे विसर्जन पार पडले आहे.
पुण्यनगरीत मानाच्या गणपतींपैकी दोन गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. मानाचा पहिला कसबा गणपती आणि दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी यांचे विसर्जन पार पडले आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यात पारंपरिक उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
पुण्यात आज सकाळीच एकदम वेळेत गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही वेळ आधीच पुण्यातील मानाचा कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालिम या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती हा अलका चौकात दाखल झाला आहे. थोड्याच वेळात चौथ्या आणि पाचवा मानाचा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन पार पडणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा गणनायक रथावर आरुढ झाले आहेत. ही मिरवणूक काहीच क्षणात बेलबांग चौकात दाखल होणार आहे.
गणपती विसर्जनावर पावसाचे सावट
आज पहाटपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर आकाशातही काळे ढग दाटून आले आहे.जणू काही बाप्पाला निरोप देण्यासाठी स्वत: वरुणराजा आला आहे, असं दृश्य मुंबईत पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज शनिवारी मुंबईत पावसाची तीव्रता कायम राहण्याची अपेक्षा आहे. आयएमडीनुसार, दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम राहील. मुंबई उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
हवामान खात्यानुसार, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पालघर जिल्ह्यात आज पावसाबाबत ऑरेंज अलर्ट लागू आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडमध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत आहे. ज्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.