पुण्यात पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
गेले दोन दिवस पुण्यात पावसाने घेतलेली विश्रांती
राज्याला पुढील दिवस यलो अलर्ट
पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता
Waether Update: गेल्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला होता. मुसळधार पावसाचा पुण्यात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पुणे शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मागचे दोन दिवस पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. आता पुन्हा पुण्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट जाहीर केला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस हा पंजाब आणि हरियाणाचा उर्वरित भाग, राजस्थान व गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या काही भागातून माघारी परतला आहे. कालचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिसा आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कायम आहे.
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास रायगड, पुणे, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने तिथे यलो अलर्ट जाहीर केला आहे.