
नालेसफाई, पालखी मार्गाचे कामे तातडीने पूर्ण करा; आढावा बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे निर्देश
पिंपरी : आगामी पावसाळा आणि आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाई, अतिक्रमण निर्मूलन, पालखी मार्गांची दुरुस्ती आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत आयुक्तांनी सर्व विभागांच्या कामकाजाची झाडाझडती घेतली आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देत कामांचा दर्जा उत्तम राखण्याचे कडक निर्देश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात शहरात कोठेही पाणी साचून पूरसदृश स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की, नालेसफाईची सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करावीत. केवळ कागदावर काम न दाखवता, नालेसफाई झालेल्या ठिकाणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या शहरातील संवेदनशील (ब्लॅक स्पॉट्स) भागांवर ‘सीसीटीव्ही’ (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यात यावे.
अतिक्रमणमुक्तीनंतर नियमित गस्त
शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. ज्या भागातील अतिक्रमण हटवले आहे, तिथे पुन्हा फेरीवाले किंवा दुकानदारांनी अतिक्रमण करू नये यासाठी नियमित निरीक्षण (निगराणी) ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच, फेरीवाल्यांसाठी निश्चित केलेल्या क्षेत्रनिहाय हॉकर्स झोनच्या अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांवर (फ्लेक्स) सातत्याने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
‘टॉयलेट पॉलिसी’, कचरा डेपोच्या जागी सुशोभीकरण
शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी महापालिकेच्या ‘टॉयलेट पॉलिसी’ अंतर्गत सार्वजनिक स्वच्छतागृहांचे अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीर्ण व नादुरुस्त झालेल्या स्वच्छतागृहांच्या जागी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त नवीन स्वच्छतागृहे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय, शहरात नागरिक ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकतात, अशा ‘क्रॉनिक गार्बेज पॉईंट्स’चा शोध घेऊन त्या जागा स्वच्छ केल्या जातील. त्या ठिकाणी कचरा टाकण्यास अटकाव करण्यासाठी तेथे सुशोभीकरण, हरितीकरण आणि वृक्षारोपण केले जाईल.
पालखी मार्गावरील खड्डे बुजवा!
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची पूर्वतयारी युद्धपातळीवर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून मार्ग पूर्णपणे अडथळामुक्त करावा. तसेच पालखीच्या मुक्कामस्थळांवर वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची आणि तात्पुरत्या शौचालयांची चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक दलाला हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे.