पुणे महानगरपालिका (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: मुळा – मुठा नदीला आलेल्या पुरासंदर्भात महापािलका प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने, पाटबंधारे विभागाने गेल्या अनेक वर्षापासून मुळा-मुठा नदी आणि नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण, अरुंद होणाारे पात्र याकडे लक्ष दिले नसल्याने मुठा नदीला जुलै महिन्यात नदीला पूर आलेला होता असा ठपका महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे. यंदाच्या वर्षी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले होते.
नदीपात्रातील अतिक्रमणे काढून टाकावीत, राडारोडा टाकण्यांवर कडक कारवाई करावी, नाल्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशा, पूर रेषेच्या आतील अवैध बांधकामे पाडून टाकावीत अशी शिफारस समितीने केली आहे. दरम्यान हा अहवाल आयुक्तांना सादर होऊन दोन महिने झाले, त्यावर अद्याप बैठक घेतली नाही. आता आयुक्तांकडून बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत.
शहरात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर सिंहगड रोड परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. शहरातील इतर भागांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले होते. सिंहगड रस्त्यांवरील सोसायट्यांमध्ये मध्यरात्री अचानकपणे पाणी शिरल्याने एकतानगरी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. हा पूर कशामुळे आला याचा अभ्यास करण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी चार सदस्यांची समिती नेमली होती. त्याचा अहवाल सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आला. पण आयुक्तांनी हा अहवाल सार्वजनिक न केल्याने सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आक्षेप घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर हा अहवाल आज जाहीर केला आहे.
हेही वाचा: Traffic Rules: दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेटची सक्ती; वाहतूक विभाग कडक कारवाई करणार
मुठा नदीला आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल जाहीर केला आहे. नदी स्थिती टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य कारवाई केली जाईल, उपाययोजना केल्या जातील.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त
काय करणार उपाययाेजना ?
– निळ्या पूररेषेच्या आत बांधकामे आहेत, त्या बांधकामावर निळी पूर रेषा, लाल पूर रेषा दर्शवावी
– ज्या ठिकाणी नदीचे अस्तित्व राहिले नाही, तेथे बांधकामे पाडून नदी अस्तित्वात आणावी
– निळ्या पूर रेषेप्रमाणे नदीचा प्रवाह अडथळामुक्त असावे, मुठा नदीतून १ लाख क्यूसेस पाणी वाहून जाण्याची क्षमता असावी
– नाल्यांची रुंदी कमी होणे, कचरा अडकणे, बांधकामे होणे यामुळे नाल्यांमध्ये पाणी तुंबून परिसरातील वस्तीत पाणी साठते. नाल्यातील हे अडथळे काढून टाकावेत
– पूर रेषेसोबतच २० हजार क्यूसेस, ३०, ४० क्यूसेस पाणी कुठल्या भागात येते हे चिन्हांकित करावे, त्याचे नकाश तयार करावेत
– प्रवाहाला अडथळे ठरणारे बंधारे, पूल काढून टाकावेत
-अतिक्रमण, अवैध बांधकाम करणारे, राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत