टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती आता रोखली जाणार; राज्य सरकारने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो- istockphoto)
पुणे: टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ४८८ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. मात्र अवघ्या महिनाभरावर पावसाळा सुरू होत असल्याने पाणी गळती रोखण्याचे काम हे दिवाळी नंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
टेमघर धरणातील गळती रोखण्यासाठी जून २०२० पर्यंत अत्यावश्यक कामे करण्यासाठी राज्य सरकारने ३२३ कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र भूसंपादन व धरणाची अन्य कामेही करणे आवश्यक असल्याने खर्च वाढला व हा खर्चाचा आकडा ४८८ कोटींपर्यंत पोचला गेला. धरणाच्या कामात भूसंपादन करण्यात आले. पण या भूसंपादनासंदर्भात न्यायालयातही काही प्रकरणे प्रलंबित होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोबदलादेखील शेतकऱ्यांना देण्यात आला.
परिणामी या कामांचा खर्च सुमारे ४८८ कोटींपर्यंत पोचला. मात्र, मंजूर खर्चापेक्षा उर्वरित निधीला मान्यता नसल्याने ही बिले जलसंपदा विभागाकडून मंजूर करता येत नव्हती. राज्य मंत्रिमंडळाने आज ४८८ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याने आता या बिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत टेमघर धरणातील पाणीगळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांसाठी अतिरिक्त ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. या संदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचे असे टेमघर धरण तातडीने दुरुस्त करण्याची पावले उचलण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. धऱणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पुण्याच्या ऊर्ध्व भागात वसलेले हे धरण पुणे महानगरासाठी धोकायदायक ठरू शकेल असा इशारा तज्ज्ञ समित्यांनी वेळोवेळी दिला होता.
जलसंपदेसंबंधी केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या विविध समित्यांनी या दुरुस्त्या लौकर कराव्या लागतील असा इशारा वारंवार दिला होता. जलसंपदा विभागाने या संबंधी मंत्रीमंडळाला सादर केलेल्या टिप्पणीत असे स्पष्ट नमूद केले होते की धरण सुरुक्षितता कायदा २०२१ मधील विविध कलमे टेमघरला लागू होतात. जर यातून काही दुर्घटना घडली तर पुणे शहराला त्याचा मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच यातून निर्माण होणाऱ्या कायेदशीर कटकटीही अधिक मोठ्या असू शकतात.