वडगाव मावळ महायुती (फोटो- टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ: महायुतीकडून सुनील शेळके यांना मावळातून उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर मावळात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. बाळा भेगडे यांच्या भूमिकेनंतर अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनील शेळके यांचा प्रचार करण्यास सांगितल्याने कार्यकर्ते देखील सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोणावळा मंडल कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संपुर्ण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला.
सुरूवातीपासून मावळचं राजकारण महाराष्ट्रात चर्चेत राहिले आहेत. याठिकाणी सुनील शेळके विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध दर्शविला होता. यात विशेष करून माजी आमदार बाळा भेगडे यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील शेळके यांच्या पाठीमागे संपुर्ण भाजप राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचनंतर लोणावळा मंडलचे शहर अध्यक्ष अरूण लाड, माजी नगरसेवक देवीदास कडू, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये बाळा भेगडे आमचे नेते आहेत. दैवत आहेत. परंतु आम्ही संघटनेचे काम करू. पक्षाचे वरिष्ठ नेते जे आदेश देतील, ते आम्हाला मान्य करावेच लागणार. ज्या पद्धतीने लोकसभेत आम्ही महायुती धर्म पाळला होता. तोच धर्म आता विधानसभेत देखील पाळू असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नव्या राजकीय समीकरणानुसार अनेक मतदारसंघात महायुतीत बंडखोरी बघायला मिळाली. ही बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश प्राप्त झाले. परंतु काही ठिकाणी बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. परंतु पक्षाने थेट त्यांच्यावर कारवाई करण्यास सूरूवात केलीय. विशेष करून भाजपने अशा अनेक बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे.
हेही वाचा: “आमदार बनवा, तुम्हाला थेट विमान…”; मावळचे उमेदवार सुनील शेळकेंचे जनतेला आश्वासन
मावळची जनता आमदार सुनील शेळके यांना काहीही कमी पडू देणार नाही, असंच आमचं ठरलंय, तालुक्यात केलेली ४,१५८ कोटींची विकास कामे, हीच तुमची ओळख आहे, मागीव ५ वर्षात आम्ही फक्त तुमचाकडे मागतोय. आता वेळ आपली आहे, आपण त्यांना आता भरभरून मते देऊन निवडून आणूयात, असे आवाहन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादूबुवा कालेकर यांनी केले. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा पवन मावळ पश्चिम विभागाचा विजयी संकल्प मेळावा पवनानगर येथे झाला. त्यावेळी कालेकर बोलत होते.