महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (फोटो- टीम नवराष्ट्र)
मंचर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिवाळी संपताच प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडील यश आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत फिरत होते अशी टीका त्यांनी केली आहे.
“आपण मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत देवदत्त निकम यांना सभापतीपद देऊन चुक केली . त्यांन तेथे मनमानी कारभार केला . व्यापाऱ्यांचा रोष ओढून घेतला . धना मेथीचा बाजार बंद पाडला. केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत तालुका फिरले . ” अशी टीका सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर केली .
यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, विष्णू काका हिंगे, दत्ताशेठ थोरात, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, अरुणराव गिरे, उपसभापती सचिन पानसरे, बाळासाहेब बाणखेले, सुनील बाणखेले, सागर थोरात,गणेश थोरात, संतोष पिंगळे रोहन थोरात, राजूशेठ भंडारी, लक्ष्मण बाणखेले, आडत व्यापारी असोसिएशन, हमाल, मापाडी संघटनांचे अध्यक्ष, सचिव यावेळी उपस्थित होते. उमेदवार दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले ” बाजार समितीत आपण प्रकाश घोलप, स्व .वसंतराव भालेराव यांना सभापती पदे दिली . त्यांनी तेथे चांगले काम करून दाखवले .
देवदत्त निकम यांना भीमाशंकर कारखान्यात अध्यक्ष पदाची केवळ पाच वर्ष संधी द्यायची होती . त्यानंतर पुढील पाच वर्षे शिवाजीराव ढोबळेंना संधी द्यायची होती . परंतू निकम यांनी गयावया करून दहा वर्षे अध्यक्षपद सोडले नाही . तालुक्यातील गावा गावात गटबाजी करण्याचे त्यांनी काम केले . माझ्याबरोबरच पंचवीस वर्षे तालुक्यात फिरून केवळ मतांवरच डोळा ठेवून आमदारकीचे स्वप्न पाहिले . त्यांनी बंद पाडलेला धना मेथी, जनावरांचा बाजार आपण पुन्हा सुरू केला . याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे . व्यापारी, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी संबंधित शेतकरी मतदारांशी जाऊन,भेटून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
हेही वाचा: “…त्यामुळे त्यांना मतदानातून योग्य उत्तर द्या”; प्रचारादरम्यान वळसे पाटलांची विरोधकांवर जोरदार टीका
व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना व्यापारी संजय मोरे म्हणाले ” दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यात जलक्रांती, हरितक्रांती केली . आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे . रोजगार उपलब्ध झाला आहे . त्याचे श्रेय वळसे पाटील यांनाच जाते . वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार देवदत्त निकम यांनी बाजार समितीत सभापती पदी असताना “हम करे सो कायदा ” प्रमाणे मनमानी कारभार केला . व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे काम केले . धना मेथी जनावरांचा बाजार बंद पडला . यामुळे साडेतीन कोटींचा महसूल बुडाला.
हेही वाचा: ‘माझी कन्या विधानसभेला तयार नाही, नाईलाजास्तव मलाच…’; दिलीप वळसे पाटलांचे वक्तव्य चर्चेत
आता सर्व व्यापाऱ्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांनाच आपला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे . यावेळी विष्णू काका हिंगे म्हणाले ” दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकर कारखाना उभारून स्वतःच्या घरात कधी चेअरमनपद ठेवले नाही . निकम यांना दहा वर्ष कारखान्यात चेअरमन पद दिले . त्याची जाण त्यांना राहीली नाही . स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेता आणि लघुशंकेनंतर बिसलेरी पाण्याने हात धूता . तुम्ही खरे शेतकरी पुत्र आहात का? असा सवाल विष्णू हिंगे यांनी केला . याप्रसंगी जयसिंग एरंडे, बाळासाहेब खिलारी, नितीन थोरात, आदींची मनोगते झाली . सूत्रसंचालन सागर थोरात यांनी केले.