(Photo - Social Media)
माळेगाव : सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची आज (रविवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने शेंडे यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
कारखान्याचे दिवंगत अध्यक्ष व लोकनेते अजित पवार यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार विद्यमान उपाध्यक्षा संगिता बाळासाहेब कोकरे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रक्रियेत नितीन शेंडे यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. शेंडे यांची निवड होताच समर्थक व संचालक मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या निवड प्रक्रियेत ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, दत्तात्रेय येळे, गणपत खलाटे, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, विशाल जगताप, प्रताप आटोळे, रतनकुमार भोसले, शेखर जगताप तसेच कार्यकारी संचालक पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नितीन शेंडे यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाला विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका व्यक्त केली. कारखान्याच्या सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन कारखान्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले






