खासदार सुप्रिया सुळे (फोटो- ट्विटर )
बारामती: मणिपूर मधील हिंसाचार प्रकरणात आम्हाला राजकारण आणायचे नाही. त्या ठिकाणचा हिंसाचार थांबण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. केंद्र सरकारने देखील याबाबत ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असून यामध्ये सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सुप्रिया सुळे बारामतीमध्ये बोलत होत्या.
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्यासंदर्भात केंद्र सरकारचा डेटा सांगतो. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्रातील हे खोक्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर काळ्या पडद्याने झाकण्याचा प्रयत्न झाला, ही दुर्दैवी घटना आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी, अशा चुकीच्या घटनाचे कधीही समर्थन करणार नाही.”
सध्या शरद पवार यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होऊ लागली असल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ”गेली सहा दशके शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपून सर्वसामान्य माणसांसाठी मोठे काम केले आहे. दिल्ली मध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून पवार साहेब यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या जनतेकडून हीच पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.”
भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधल्याचे वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या,” छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कोणी शोधली हे इतिहास सांगतो. मात्र दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक इतिहास बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करण्यात येतो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो, ते वास्तव असते. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुरत बद्दल वक्तव्य केले होते, भाजपसह त्यांच्यासोबत काम करणारे चुकीचा इतिहास मांडत असतील तर आम्ही कदापिही सहन करणार नाही.”