
sangram jagtap and gopichand padalkar at mpsc protest
पुणे : पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन (MPSC Student Protest) सुरू असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना विविध राजकीय नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सध्या शास्त्री रोडवरील आंदोलनात परीक्षांची वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धत कायम ठेवण्याची मागणी प्रमुख असल्याचं वृत्त आहे.
आंदोलनाला पाठिंबा देताना संग्राम जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. या आंदोलनामागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘हे सगळं झालं कुणामुळे? त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तुमच्यानंतर एकाही विद्यार्थ्यावर अशी वेळ आली नाही पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडाव्यात, असं आवाहनही जगताप यांनी केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याच्या चर्चेवर बोलताना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या तर त्याला राजकारण म्हटलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्यानुसार शासनाकडून योग्य आदेश निघायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्याबाबत सुरू असलेल्या आरोपांवर जगताप यांनी सावध भूमिका घेतली. अध्यक्षांचे काही व्यक्तींशी संबंध असल्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी, ‘संबंध प्रत्येकाचे प्रत्येकासोबत असतात. संबंधांसाठी कुणाची परवानगी लागत नाही,’ असं म्हटलं. अध्यक्ष दोषी आहेत की नाही, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे पुरावे आणि चौकशीशिवाय अंतिम निर्णय घेता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, एमपीएससीच्या कारभाराविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर परीक्षा ऑफलाइन घेणे आणि भरती प्रक्रियेसंदर्भात काही निर्णय जाहीर करण्यात आले होते. मात्र, अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह काही मुद्द्यांवर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष कायम असल्याने पुण्यात आंदोलन सुरू आहे.
विद्यार्थ्यांचं आंदोलन हा लोकशाहीतील मार्ग असल्याचं सांगत जगताप यांनी त्यांच्या मागण्यांची तीव्रता सरकारपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. आता या आंदोलनावर सरकारकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
Police Complaint Against Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंसह सहकाऱ्यांवर मुंबई पोलिसांत गु्न्हा दाखल