
Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती
गेल्या दशकभरात भारताच्या मेट्रो नेटवर्कचा अभूतपूर्व विस्तार झाला असून, त्यामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी गुरुवारी व्यक्त केले. 2014 मध्ये देशातील केवळ पाच शहरांमध्ये 248 किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क होते. आता हे जाळे सुमारे 1,200 किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, 26 शहरांना मेट्रोने जोडण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये मोदी यांनी मेट्रोच्या विस्ताराचा उल्लेख केला. 2014 पूर्वीच्या वेगानेच मेट्रोचा विस्तार सुरू राहिला असता, तर पुण्यासारख्या शहरांना मेट्रोसाठी अनेक वर्षे नव्हे, तर कदाचित दशके वाट पाहावी लागली असती, असे ही ते म्हणाले.
मेट्रोमुळे प्रवाशांचा वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचतो. कुटुंबासाठी अधिक वेळ मिळत असून, उत्पादकता आणि रोजगाराच्या संधींमध्येही सुधारणा होत आहे. सध्या दररोज एक कोटींहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करतात, असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी 2 नोव्हेंबर रोजी केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये पुणे मेट्रोच्या नव्या पिंक लाइन अर्थात लाइन-3 ची वैशिष्ट्ये सांगितली. सुमारे 23 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका हिंजवडी आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
या मार्गिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे संचालन पूर्णपणे महिला ट्रेन ऑपरेटर करणार आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे 30 टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा नमुना ठरणार आहे.
Girnar Lili Parikrama यंदा 20 नोव्हेंबरपासून; लाखो भाविक सहभागी होण्याची शक्यता
अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रोशी संबंधित सुमारे 21,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यामध्ये 8,300 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुणे मेट्रो लाइन-3 (पिंक लाइन) चा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट वाहतूक सुविधांवर आधारित हा प्रकल्प आहे.
याशिवाय पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही करण्यात आली. या टप्प्यासाठी सुमारे 13,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये लाइन 2 ए, 2 बी, ४ आणि 4 ए विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील निवासी, व्यावसायिक आणि आयटी क्षेत्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
मेट्रो प्रकल्प हे केवळ प्रवासाचे साधन नसून, शहरी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचे माध्यम असल्याचे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. आधुनिक आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उभारून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करणे आणि आर्थिक घडामोडींना चालना देणे, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माहितीनुसार, देशातील मेट्रो नेटवर्क सुमारे 1,200 किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे.
Ans: देशातील 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा पोहोचली आहे.
Ans: या मार्गिकेचे संचालन पूर्णपणे महिला ट्रेन ऑपरेटर करणार आहेत. तसेच विजेच्या गरजेपैकी सुमारे ३० टक्के वीज सौरऊर्जेतून मिळवण्याचे नियोजन आहे.