कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा बसतोय मोठा फटका; दुष्काळाच्या चाहुलीने शेतकरी धास्तावले (File Photo)
आळेफाटा : आळेफाटा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीला लागले असले, तरी वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी पेंढार, खामुंडी, नवलेवाडी, वडगांव आनंद, पिंपळ वडी परिसरात कांदा लागवडीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च एकरी ९० ते ९५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने कांदा उत्पादनाचा खर्च आता लाखाच्या उंबरठ्यावर आला आहे.
पावसाची अनिश्चितता आणि आगामी काळातील दुष्काळाची चाहूल यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतशिवारात सध्या मशागत, फणणी, रोटर मारणे, सरी पाडणे, शेत बांधणी तसेच कांदा रोपांची लागवड सुरू आहे. कांदा हे माळशेज परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने दरवर्षी मोठ्या अपेक्षेने कांद्याची लागवड केली जाते. मात्र, यंदा मजुरी, खते, कीटक नाशके, रोपे आणि पाणी व्यवस्थापनाचा खर्च वाढल्याने लागवड करावी की नाही, असा प्रश्न उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.
Kandla Port : बंदर पायाभूत सुविधांना नवी चालना; डीपीए कंडला येथे एस्सार पोर्ट्स उभारणार मेगा टर्मिनल
आळेफाटा परिसरात दुष्काळाचे परिणाम भागानुसार वेगवेगळे दिसून येत आहेत. नदीकाठचा आणि कालव्या लगतचा भाग तुलनेने पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारावर शेती करत असला, तरी पाण्याचे नियोजन आणि भविष्या तील उपलब्धता याबाबत शेतकऱ्यांना चिंता आहे. दुसरीकडे पठार भागात पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न
पावसाने साथ न दिल्यास विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे कांदा लागवडीचा खर्च वाढत असताना दुसरीकडे पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाचा करावा लागतोय सामना
कांदा हे मजूरप्रधान पीक असल्याने मजुरीच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. सध्या महिला मजुराला दिवसाला सुमारे ६५० रुपये, तर पुरुष मजुराला ८०० रुपये हजेरी द्यावी लागत आहे. लागवड, खुरपणी, फवारणीसाठी पूरक कामे तसेच काढणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे मजुरीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अनेक वेळा वेळेत मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागतो.
मजुरीसाठी येतो आणखी खर्च
कांदा पिकासाठी सुरुवातीला शेताची मशागत, फणणी, रोटर मारणे आणि सरी पाडण्यासाठी एकरी सुमारे ४ हजार रुपये खर्च येतो. शेत बांधणीसाठी सुमारे ३ हजार रुपये, तर लागवडीच्या मजुरीसाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च होतो. कांदा रोपांची खरेदी व उपटणीसाठी जवळपास १८ हजार रुपये, रासायनिक खतांच्या दोन डोससाठी १५ हजार रुपये, कीटकनाशकांच्या फवारणीसाठी १५ हजार रुपये, पाणी भरण्यासाठी सुमारे ८ हजार रुपये, तर काढणीच्या मजुरीसाठी आणखी १७ हजार रुपये खर्च होतो.
FAQ
पाणी टंचाईचा नेमका किती फटका बसतोय? कोणत्या भागात जास्त?
– महाराष्ट्रात यंदा 74% राज्य – 358 पैकी 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. अहवालानुसार 84.1% महाराष्ट्र कोरडा / दुष्काळी स्थितीत आहे .नाशिक जिल्हा – फक्त 34.3% पाऊस – नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या एक तृतीयांशच झाला.
उपाय काय आहेत? शेतकऱ्यांनी काय करावे?
– ठिबक सिंचन + मल्चिंग: पाणी 50% वाचते – सरकारकडून 80% अनुदान – महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कराकमी पाण्याचे वाण: फुले समर्थ, नाशिक लाल, भीमा सुपर – 60-70 दिवसात तयार होणारे वाण वापरा.
सरकार काय मदत करत आहे?
– दुष्काळ जाहीर 265 तालुके: पीक कर्ज पुनर्रचना, वीज बिलात सवलत, रोजगार हमी कामे वाढवली – पण थेट पीक नुकसान भरपाई अजून जाहीर नाही – पंचनामे सुरू आहेत.






