प्रताप सरनाईक (फोटो- सोशल मीडिया)
२०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन बदल्या
इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार
मुंबई: परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आल्या.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या.
भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना; ५७ ई-वाहनांचे लोकार्पण
परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले. ही ई-वाहने लवकरच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात येणार असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रशासनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहनधारकांना आरटीओच्या अनेक सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.
‘परिवहन’ मोबाईल ॲप आपल्याला कोणकोणत्या सुविधा देते? जाणून घ्या
HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, ३० जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.






