पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पाची 'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसराचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे. त्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर जागेवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ (PIECC) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होताना दिसत आहे. या प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने तातडीची पावले उचलली असून, त्या दृष्टीने महानगर आयुक्तांनी ‘लँड मॉनिटायझेशन सेल’ला पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या. व्हीआयपी लाउंज, स्वच्छतागृहे तसेच आगामी ‘Indian Machine Tool Manufacturers’ Association’ (IMTMA)च्या प्रदर्शनस्थळाची पाहणी करून उर्वरित देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी दिल्या. तसेच, नागरिकांच्या व उपस्थितांच्या सुरक्षेसाठी तातडीने अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश दिले.
या पाहणीदरम्यान ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, उपायुक्त (जमीन व मालमत्ता) हिम्मत खराडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, उपअभियंता शंकर कोळेकर आणि ‘लँड मॉनिटायझेशन सेल’चे सल्लागार उपस्थित होते.
या प्रकल्पामध्ये सुमारे एक कोटी चौरस फूट विक्रीयोग्य जागा, 24 हजार कार पार्किंग जागा, एक मेट्रो स्टेशन, एक गेटवे, एक अंतर्गत मोनो-रेल आणि सहा शहरी गावांना सेवा देणारे भूमिगत पार्किंग पॉड्स यांची संकल्पना आहे. मरीना असलेले एक तलाव, एक मोठे पुणे आय व्हील, एक जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्र, हॉटेल्स आणि परिषद सुविधा या प्रकल्पाची शोभा वाढवणार आहेत.
जागतिक प्रदर्शन शहर हे पुणे महानगर प्रदेशातील सर्वात सुस्पष्ट आणि सर्वात वैविध्यपूर्ण शहरी केंद्र असेल. मेट्रो स्टेशनला या केंद्राच्या प्रवेशद्वाराशी जोडणारा एक स्कायवॉक असेल, जो एका भव्य ‘व्हरांड्यासारख्या’ पॅव्हेलियन असलेल्या ‘सिटी गेटवे’मधून जाईल.
सिटी गेटवे हे केवळ एक भौतिक प्रवेशद्वार नसून…
सिटी गेटवे हे केवळ एक भौतिक प्रवेशद्वार नसून, आगमन आणि प्रस्थान कक्षांसह, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलप्रमाणे डिझाइन केलेले एक आधुनिक वाहतूक केंद्र असेल. हे एक बहुविध वाहतूक टर्मिनल असणार आहे.






