संग्रहित फोटो
पिंपरी : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. या तीनही तालुक्यांतील प्रमुख पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासाठी ६७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी उभारी मिळणार आहे. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. रस्ते विकास, पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थांवर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी दिली.
खडकवासल्यात ‘मरीन ड्राईव्ह’चा अनुभव
पुणेकरांचे आवडते ठिकाण असलेल्या खडकवासला धरण परिसरात एक कोटी रुपये खर्चून सुसज्ज ‘चौपाटी’ विकसित केली जाणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धरणाच्या कडेला ‘चेनलिंक फेन्सिंग’ (संरक्षक कुंपण) उभारले जाईल. यामुळे पावसाळ्यात होणारी गर्दी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.
गड-किल्ल्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी कोट्यवधींचा निधी
राजमाची किल्ला : १४ किमी रस्त्यासाठी १७ कोटी रुपये.
लोहगड किल्ला : ५.५० किमी रस्त्यासाठी ७ कोटी रुपये.
तिकोना व पवना परिसर : ६.५० किमी रस्त्यासाठी ८ कोटी रुपये.
तुंग किल्ला : ४ किमी रस्त्यासाठी ६ कोटी रुपये.
मुगाव ते ताम्हिणी घाट : १४ किमी रस्त्यासाठी १० कोटी रुपये.
स्कायवॉक आणि तलाव सुशोभीकरण
लोणावळ्यात ८२२ कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा ‘स्कायवॉक’ हे भविष्यातील मुख्य आकर्षण ठरणार आहे. याशिवाय, मुळशी तलावाचे सुशोभीकरण आणि पार्किंगसाठी २ कोटी, तर पळशे धबधबा येथे दरड कोसळण्यापासून संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या आणि रेलिंग बसवले जाणार आहेत.
८ धार्मिक स्थळांचा होणार विकास
पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात: श्री चिंतामणी गणपती, एकविरा देवी मंदिर, श्री महागणपती, बनेश्वर महादेव आणि विठ्ठल मंदिर परिसराचा समावेश आहे. येथे सोलर सिस्टीम, वाहनतळ, निवारा शेड, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय केली जाईल.
२७ गावांत सांडपाणी प्रकल्प
केवळ पर्यटनच नव्हे, तर पर्यावरण रक्षणासाठी खडकवासला आणि पवना धरण क्षेत्रातील २७ गावांमध्ये १,२०९ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) राबवला जाणार आहे. यामुळे धरणांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
“पीएमआरडीए आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे लवकरच पूर्ण केली जातील. या नवीन स्ट्रक्चरल प्लॅनमुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.” — शिवप्रसाद बागडी, मुख्य अभियंता, पीएमआरडीए






