नवी-जनरेशन Audi Q3 लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असून, या सणासुदीच्या काळात ही लक्झरी एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. ऑडीने या नव्या मॉडेलचा पहिला टीझर जारी करत गाडीच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या Q3 मध्ये बाह्य डिझाइन, प्रीमियम केबिन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
नव्या ऑडी Q3 चा एक्स्टेरियर लूक अधिक शार्प आणि आक्रमक करण्यात आला आहे. गाडीच्या समोरील बाजूस मोठी सिंगलबॉक्स ग्रिल आणि मायक्रो-एलइडी मॉड्यूल्स असलेले मॅट्रिक्स एलइडी हेडलाइट्स दिले आहेत. मागील बाजूस पूर्ण रुंदीचा लाईटिंग बार, डिजिटल ओएलइडी टेल-लॅम्प्स आणि प्रीमियम व्हेरियंट्समध्ये चमकणारा ऑडीचा लोगो देण्यात आला आहे.
Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय
गाडीच्या आतील रचनेत बदल करत ऑडीने गिअर सिलेक्टर मध्यभागातून काढून स्टीयरिंगच्या बाजूला शिफ्ट केला आहे, ज्यामुळे पुढील सीट्सच्या मध्ये सामान ठेवण्यासाठी जास्त जागा मिळते. केबिनमधील बाहेरचा आवाज कमी करण्यासाठी ॲकॉस्टिक फ्रंट ग्लास वापरला आहे. त्याशिवाय नव्या डिजिटल इंटरफेससोबत ड्रायव्हरचा थकवा ओळखणारा स्पेशल कॅमेरा ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम जोडण्यात आली आहे.
भारतीय बाजारातील व्हेरियंटमध्ये २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे, जे २०४ hp पॉवर आणि ३२० Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑडीच्या प्रसिद्ध ‘Quattro’ ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीमशी जोडलेले असेल. जागतिक बाजारात २५.७ kWh बॅटरीसह ११९ किमीची इलेक्ट्रिक रेंज देणारे प्लग-इन हायब्रिड मॉडेलही सादर केले गेले आहे.
नव्या Q3 मधील स्पेस मॅनेजमेंटवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात ४८८ लिटरची बूट स्पेस मिळते, जी मागील सीट्स फोल्ड केल्यानंतर १,३८६ लिटरपर्यंत वाढवता येते. मागील रांगेतील सीट्स पुढे-मागे सरकवण्याची सोय असून, विविध गरजा लक्षात घेऊन गाडीची टोईंग क्षमता तब्बल २,१०० किलोपर्यंत वाढवण्यात आली आहे.