सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. खेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित ‘चाकण डी-क्लॉग वर्क’ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांचा थेट ताळेबंद मांडण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी प्रत्यक्ष ६ तास सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना कडक शब्दांत सुनावत, मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास थेट ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्याचा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुलभ आणि जलद करण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने १००.१४ कोटी रुपये खर्चाच्या ‘चाकण डी-क्लॉग वर्क’ योजनेअंतर्गत १७ किलोमीटर लांबीच्या सात प्रमुख रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तांनी प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांसोबत पाहणी दौरा केला.
आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश व रस्ते विकास नियोजन:
कुरुळी फाटा ते निघोजे (२.५ किमी) : अडीच किलोमीटरच्या या मार्गावरील ७ मीटर रुंदीच्या काँक्रीटीकरणाचे काम पुढील १५ दिवसांच्या ‘बार चार्ट’नुसार जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
चऱ्होली खुर्द ते आळंदी (मरकळ रोड – २ किमी) : या टप्प्यातील रस्त्याचे काम तातडीने व उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच कामाचा दर्जा न राखल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.
एमआयडीसी व इतर मार्ग : मर्सिडीज चौक येथील ‘बॉटलनेक’ (वाहतुकीचा अडथळा) दूर करून वाहतूक वळवण्याचे नियोजन करणे, महावितरणचे वीजखांब हटवणे आणि नाल्यांवर क्रॅश बॅरिकेड्स बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच खालुंब्रे ते एमआयडीसी फेज-२, पुणे-नाशिक रस्ता-आळंदी फाटा ते आळंदी आणि चिखली ते मोई रस्त्यांचे रुंदीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विनाअडथळा पूर्ण केले जाईल.
गुणवत्ता आणि वेळेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयुक्तांनी उत्तरदायित्वाची जाणीव ठेवण्याचे बजावले. या पाहणी दौऱ्यात प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, उपअभियंता नंदकुमार खोत, कनिष्ठ अभियंता जितेंद्र पगार यांच्यासह कंत्राटदार व पीएमसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्पाची मुख वैशिष्ट्ये:
योजनेचे नाव : चाकण डी-क्लॉग वर्क
प्रशासकीय निधी : १००.१४ कोटी
मुख्य उद्दिष्ट : चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूककोंडी फोडून प्रवासाचा वेळ वाचवणे.
दीर्घकालीन दर्जा : पुढील १० वर्षे रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर बंधनकारक.



