संग्रहित फोटो
पाटस : पुणे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तीन जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले असून, दोन जण फरार झाले आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर सोमवारी ( दि. १३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या आसपास टोल नाक्यावर लेन क्रमांक चार वर एक चार चाकी स्विफ्ट कार आली. या कार मधून चार-पाच जण हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन खाली उतरत थेट त्यांनी टोल नाक्यावर हल्ला केला. कोयत्याने टोलनाक्याच्या काचा फोडल्या, टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही तोडफोड करून लेनवर पुढे जाऊन परत वळून पुन्हा टोलवर कोयत्याने हल्ला चढवत तोडफोड करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या हल्ल्यात एका टोल कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार बसल्याने तो किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अचानक गाडीतून चार-पाच जण उतरतात आणि थेट कोयत्यांनी हल्ला चढवतात. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ महामार्गावरुन प्रवास करणारे वाहन चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दहा पंधरा मिनिटे या टोळीने टोलनाक्यावर कोयता फिरवत आणि कोयत्याने टोलनाक्याच्या लेनची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याने तणाव निर्माण झाला होता.
तीन जणांना पाठलाग करून पकडले
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या टोळीने टोलनाक्याची तोडफोड करून सोलापूर बाजुला भरधाव वेगाने धुम ठोकली. टोलनाक्यापासून काही अंतरावर शेतकऱ्यांच्या अंतर्गत कच्च्या रस्त्यावरून पळून जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटला. आणि या टोळीच्या मागावरच असलेल्या पोलीसांनी आणि टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तीन जणांना पाठलाग करून पकडले तर दोघेजण उसाच्या शेताचा आधार घेत पसार झाले. त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली असून पाटस पोलीस चौकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : पुरंदरमधील मुलांचं मोठं यश; 11 विद्यार्थ्यांची एकाचवेळी पोलीस दलात निवड
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापुर्वीही टोल नाक्यावर सातत्याने हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोमवारी सायंकाळी दिवस मावळण्याच्या सुमारास घडलेल्या कोयता गॅंगच्या दहशतीमुळे पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहन चालक आणि प्रवाशांची सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.






