
भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
रांजणी/ रमेश जाधव : आंबेगाव तालुक्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या तळेघर-निगडाळे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदाराने केलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत. लाखो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरल्याची तीव्र भावना स्थानिक नागरिक व भाविकांनी व्यक्त केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून, राज्यासह देशभरातून वर्षभर लाखो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात. मंचर घोडेगाव-डिंभे-तळेघर मार्गे भीमाशंकरकडे जाणारा हा प्रमुख आणि पर्यायी मार्ग असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच भाविकांची सर्व वाहतूक याच रस्त्यावर अवलंबून आहे. गेल्या वर्षी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर दीर्घकाळ रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. वाढत्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने डिसेंबर महिन्यात साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून तळेघर ते निगडाळे या सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील रस्त्याची डागडुजी आणि बीएमचे काम हाती घेतले. मात्र काम सुरू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच नव्याने टाकलेला रस्ता उखडू लागल्याची बाब स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली होती. पुढे काम सुरू असतानाच मागील भागातील डांबराचा थरही निघू लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी फिरकला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, जुन्या रस्त्यावरील माती न काढता, रस्ता क्रॅचिंग न करता त्यावरच अत्यल्प प्रमाणात बिटुमिनची फवारणी करण्यात आली. निकृष्ट दर्जाची खडी, थंड पडलेला डांबरी माल आणि अपुऱ्या दर्जाच्या साहित्याचा वापर करून काम पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाहनचालकांना मोठी कसरत
दरम्यान, ९ जानेवारी ते १५ जून या कालावधीत भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याच्या कामामुळे दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कमी होती. मात्र, मंदिर पुन्हा खुले झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढली असतानाच मागील आठवड्यातील पावसाने नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले घोटाभर खोल खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि तातडीने रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“श्रीक्षेत्र भीमाशंकर हे देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, येथे वर्षभर लाखो भाविक येतात. मागील काळात काहि दिवस मंदिर दीर्घकाळ बंद असल्याने वाहतूक कमी होती. आता गर्दी वाढत असताना साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची ही अवस्था झाली आहे.कामाच्या दर्जाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर मंचर-भीमाशंकर मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल. -संजय गवारी, पंचायत समिती सदस्य.