
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, बचाव आणि पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित भागांतील नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्याचे, संपर्क तुटलेल्या गावांशी दळणवळण युद्धपातळीवर पूर्ववत करण्याचे आणि मानवी जीविताचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा, धोकादायक भागांतील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे तसेच निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
महसूल विभागाने समन्वय ठेवावा
पूर, भूस्खलन आणि धरण विसर्गाबाबत एसएमएस, सोशल मीडिया, ग्रामपंचायत आणि स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून वेळेवर सूचना देण्याचे आदेश त्यांनी दिले. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागाने समन्वयाने बचावकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत द्यावी
बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखावे, अफवांवर नियंत्रण ठेवून केवळ अधिकृत माहितीच प्रसारित करावी तसेच मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार तातडीची मदत द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धरणसाठा वाढल्याने नदीपुलावरील वाहतूक टाळावी
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीवरील काही पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये किंवा पाण्यात उतरू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.