बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय (फोटो- टीम नवराष्ट्र)
सुनयना सोनवणे/पुणे: दिवाळी येतेय… कंदील, दिवे, तोरणे सगळ्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अगदी काही दिवसांवर सण आला आहे. त्यामुळे बाजारात एकच लगबग सुरू आहे. शहरात दिवाळीची चाहूल लागली की प्रत्येक गल्लीबोळात कंदिलांचे रंगीत उजेड पसरतात. पण या कंदिलांच्या मागे असते हस्तकलेची, परंपरेची आणि आत्मनिर्भरतेची एक अनोखी कहाणी. शहरातील बुरुड आळी हे असेच ठिकाण आहे, जिथे पिढ्यान्पिढ्या बांबूपासून वस्तू तयार करण्याचा व्यवसाय जिवंत ठेवला गेला आहे. आज या परंपरेला आधुनिक स्वरूप देत इथल्या महिलांनी बांबूपासून बनवलेले वेगवेगळ्या आकारांचे, आकर्षक आणि पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी या कंदिलांना मोठी मागणी असते.
बुरुड आळीत सध्या महिलांचे प्रमाण या व्यवसायात सर्वाधिक आहे. कुटुंबातील पुरुष पारंपरिक साधनांनी बांबू चिरण्याचे, साचे तयार करण्याचे काम करतात, तर महिला नक्षीकाम, आकार देणे आणि सजावट करण्याची जबाबदारी सांभाळतात. अनेकांनी हे कौशल्य घरगुती उद्योगात रूपांतरित केले आहे. दिवाळीचा काळ म्हणजे त्यांच्यासाठी कामाचा हंगाम असतो.
विशेष म्हणजे, आता या महिलांनी आसाममधून अनेक नवीन डिझाइनचे आणि आकारांचे कंदील आयात केले आहेत. या कंदिलांची किंमत साधारणतः २५० रुपयांपासून सुरू होते. तर पारंपरिक आकाराचे कंदील आणि त्यांचे साचे मात्र इथेच, बुरुड आळीत तयार केले जातात. हे स्थानिक कंदील आकारानुसार १५० ते ३०० रुपयांच्या दरम्यान विकले जातात. कंदील बनवण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्याही येथे स्वतंत्रपणे विकल्या जातात. अनेक छोटे उद्योजक आणि विद्यार्थीदेखील येथे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात.
वस्तू बनवण्यासाठी लागणारा बांबू राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही आयात केला जातो. बुरुड समाजाचा हा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आहे. पूर्वी बांबूच्या चाळण्या, टोपल्या, सूप, झाडू, इत्यादी घरगुती वस्तूंना मागणी होती. पण बदलत्या काळानुसार या पारंपरिक व्यवसायात आधुनिकतेचा स्पर्श आला आहे. आता इथल्या महिलांनी आपली कला पारंपरिक वस्तूंसोबतच कंदीलनिर्मितीकडेही वळवली आहे.
टिकाऊपणा, हलके वजन आणि पर्यावरणपूरक स्वरूप हे या कंदिलांची वैशिष्ट्ये आहे. कागद, प्लास्टिक किंवा फॅन्सी लाईट्सच्या तुलनेत बांबूचे कंदील अधिक नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण दिसतात. वर्षभर काही लोक घर सजावटीसाठी हे कंदील वापरतातच, पण दिवाळीच्या काळात मात्र त्यांची मागणी दुपटीने वाढते.
आज या महिलांनी आपला पारंपरिक व्यवसाय नव्या कल्पनांद्वारे जिवंत ठेवला आहे. बुरुड आळीतील बांबू कंदिलांनी शहराच्या दिवाळीला वेगळा रंग दिला आहे. असा रंग, जो परंपरा, कष्ट आणि सर्जनशीलतेच्या तेजाने उजळतो आहे.
‘लोक आता सगळ्यांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा कंदील शोधतात. म्हणून बांबूच्या कंदिलांची मागणी वाढली आहे. हे कंदील सुंदर आहेतच, सोबत पर्यावरणासाठीही हितकारक आहेत.’
-चित्रा राजेश मोहिते,
बांबू कारागीर आणि व्यावसायिक, बुरुड आळी