पुण्यातील सराईत गुन्हेगाराला नागपुरात केलं स्थानबद्ध; पुणे पोलिसांची कामगिरी
पुणे : बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शिवा उर्फ शिवम गणेश माने (वय २९, रा. अण्णाभाऊ साठेनगर, सुप्पर बिबवेवाडी, पुणे) याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. शिवम माने हा या भागातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आता एमपीडीएनुसार कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
सराईत गुन्हेगार शिवम माने याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 2020 पासून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र/अग्निशस्त्र बाळगणे, मारामारी करणे, बालकांचे लैगिंक अत्याचार करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, हत्याराचा धाक दाखवून धमकी देणे, वाहनांची तोडफोड करणे व दरोडा यासारखे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास तयार होत नव्हते.
दरम्यान, गुन्हेगार शिवा उर्फ शिवम गणेश माने यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त (परि-५) धन्यकुमार गोडसे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्यासह सर्व्हलन्स पथकाचे पोलिस उपनिरीक्षक महेश जगताप, पोलिस हवालदार संजय गायकवाड, विजय लाड, अनिल कर्चे, पोलिस कॉन्स्टेबल महेश गिरी, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, अशिष गायकवाड व ज्योतिष काळे यांच्या पथकाने एम.पी.डी.ए. प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता.
त्याप्रस्तावाची आयुक्तांनी पडताळणी करून, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शिवा उर्फ शिवम गणेश माने यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षे स्थानबध्द करण्याबाबत कार्यालयीन आदेश जारी केला. आता त्याची नागपुर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.