सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ! फक्त मुगाच्या शेंगा तोडल्याने धाकट्याने केला मोठ्या भावाचा खून
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यातच यवतमाळ येथे सख्ख्या भावानेच आपल्या थोरल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेतातील मुगाच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून या भावंडांमध्ये भांडण झालं होतं. अखेर याचं पर्यावसन खुनात झालं.
नीलेश अशोक रिंगे (वय ३५, रा. माळकिन्ही) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे तर प्रदीप अशोक रिंगे (वय ३०, रा. माळकिन्ही) असे त्याच्या मारेकरी भावाचे नाव आहे. शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावावरच वेळवाच्या काठीने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही शेतशिवारात मंगळवारी (दि. २६) घडली.
नीलेश हा सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या शेतात गेला. तसेच शेतातील कामे करण्यात व्यस्त होता. दरम्यान, आरोपी भाऊ प्रदीप हा तेथे आला. यावेळी त्याने शेतातील मुगाच्या शेंगा तोडल्या. नेमक्या याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रदीपने मोठा भाऊ नीलेशवर वेळवाच्या काठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नीलेश हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तसेच काही क्षणातच जागीच मृत्युमुखी पडला.
पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी हजर
ही बाब काही वेळानंतर शेजारी शेतकरी आणि शेतमजुरांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच पसार आरोपी प्रदीप रिंगे याचा गावात शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर याप्रकरणी आरोपीविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला.
बुलडाण्यात वरिष्ठ लिपिकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा स्थित पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या अतुल यांची हत्या करण्यात आली. त्यांना रस्त्यात अडवून, त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. याप्रकरणातील आरोपी पसार झाल्याचे दिसून आले आहे.