संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशबरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या कारणांवरुन गुन्हेगारांच्या टोळ्या देशभरातील विविध भागात धुडगूस घालत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटनांनी नागरिक हैराण होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. बियर आणायला सोबत न गेल्यावरून वाद झाल्यानंतर तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर चावीनेही डोक्यात मारून तरुणाला जखमी केले आहे.
ही घटना वाकडेवाडी येथील ब्रम्हा मोटर्स शोरूमसमोर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयुर संतोष चौधरी (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर खडकी पोलिस ठाण्यात अक्रम इराणी (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्रम इराणीने तक्रारदाराला “माझ्यासोबत बियर आणायला चल” अशी विचारणा केली होती. मात्र तक्रारदाराने “मला बायकोसोबत खरेदीला जायचे आहे, तू जा” असे सांगितले होते. त्यावरून तो संतापला. त्याने तक्रारदाराला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तक्रारदाराने मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांकडे हाका मारल्या. त्यावर आरोपीने “कोणी मध्ये आला तर त्यालाही ठार मारेन, मी इथला भाई आहे” असे म्हणत दहशत पसरवली. त्यानंतर चावीने तक्रारदाराच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याला जखमी केले. खडकी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला
खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.