
64 तासांनंतरही बचावकार्य सुरूच ! अत्याधुनिक कटरने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला; आतापर्यंत काय घडलं?
दुर्घटनेनंतर एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, अजूनही आठ कामगार स्लॅबखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली आहे.
Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली
दरम्यान, इमारतीचा उर्वरित ढाचा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. मोठ्या काँक्रीट स्लॅबमुळे जेसीबी किंवा जड यंत्रांचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून, अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने स्लॅबचे तुकडे करून हटवले जात आहेत.
बचाव पथकाने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्यावरील अवशेष हटवण्याचे काम सुरू केले आहे. याच स्लॅबखाली बेपत्ता आठ कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक अवशेष काळजीपूर्वक हटवला जात असून, कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
गेल्या जवळपास तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत बचाव पथक सातत्याने प्रयत्न करत असून, आजच्या दिवसात शोधकार्य पूर्ण होईल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ढिगाऱ्याची जटिल रचना आणि इमारतीच्या अस्थिर अवस्थेमुळे बचावकार्याला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. प्रशासनाने घटनास्थळी सर्व आवश्यक यंत्रणा तैनात ठेवली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
इमारतीची रचना पूर्णपणे अस्थिर आहे, ज्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, इमारत अंदाजे ४५ अंशांनी झुकली आहे. एस.बी. सिंग म्हणाले, “इमारत पुन्हा कोसळण्यापासून रोखणे हे आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. तसे झाल्यास, बचाव कर्मचारीदेखील ढिगाऱ्याखाली अडकू शकतात. आत अडकलेल्यांवर आणखी ढिगारा पडणार नाही याची आम्ही खात्री करण्याचा प्रयत्न करत आहोत.” बचाव कार्यात अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात नाही. यंत्रसामग्रीच्या कंपनामुळे इमारतीचा उर्वरित भाग कोसळू शकतो. अडकलेल्या लोकांचा किंवा स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून बचाव कर्मचारी हळूहळू हाताने ढिगारा बाजूला करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण …