
Pune News: PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, PMC JE भरती परीक्षेबाबत तयार करण्यात आलेल्या IBPS अहवालात काही गुणांकन ‘non-genuine’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच परीक्षेदरम्यान unfair means वापरले गेले असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
या निरीक्षणांमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान धनंजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह अॅड. असीम सरोदे यांची भेट घेतली. PMC आयुक्तांना कायदेशीर नोटीस देण्यासह पुढील न्यायालयीन लढ्याची तयारी करण्याचा निर्णय झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
काँग्रेसने PMC JE परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात झालेल्या १४६ नियुक्त्यांचा फेरविचार करून संबंधित उमेदवारांचे joining स्थगित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. त्याचबरोबर परीक्षेशी संबंधित CCTV फुटेज, server logs, biometric records आणि अन्य डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
IBPS, TCS आणि E&Y यांनी केलेल्या technical findings चे स्वतंत्र forensic परीक्षण करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीही भूमिका मांडण्यात आली आहे.
धनंजय शिंदे यांनी सांगितले की, हा लढा कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात नसून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर आणि न्यायालयातही लढा देईल, असा इशारा त्यांनी दिला.